Advertisement

मी आरसा बोलतोय आत्मकथन मराठी निबंध | Aarshache manogat / atmakatha

मी आरसा बोलतोय मराठी निबंध | Mi arsa boltoy marathi nibandh atmakatha

काल परवाची गोष्ट आहे. मी आरशासमोर उभा राहून माझा मलाच निरखून पाहत होतो. तेवढ्यात मला कुठून तरी आवाज आला... म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागलो. परंतु रूमात माझ्या शिवाय कोणीही नव्हते. इतक्यात पुन्हा आवाज आला अरे ऐ दादा ऐ एकडे पहा, मी आरसा बोलतोय! समोर पाहतो तर काय चक्क आरसा माझ्याशी बोलत होता. मी थोडा घाबरलो हे कसे शक्य आहे. परंतु आरसा मला समजावीत सांगू लागला. घाबरू नको, खूप दिवसांपासून मला तुझ्याशी बोलायचं होतं. आणि आज मला संधी मिळाली.


अरे, जेव्हा मानव उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर होता, तेव्हा मानवाजवळ अन्न, वस्त्र व निवारा तर होताच. परंतु मनुष्याने स्वतःचे प्रतिबिंब पहिल्यांदा पाण्यात पाहिले. तेव्हा त्याला आपले रूप लक्षात आले. यानंतर पाण्यातून काचेचा व काचेतून माझा जन्म झाला. आधीच्या काळात प्रतिमा पाहण्यासाठीचे एकमेव साधन पाणीच होते. कालांतराने माझे रूप बदलत गेले. आज माझी अनेक रूपे आहेत, अनेक प्रकारात मी उपलब्ध आहे अंतर्गोल, बहिर्गोल, सपाट, गोल मोटरीचा आरसा, घरातला लहान आरसा, महलातील मोठे आरसे ही सर्व माझीच भावंडे आहेत, फक्त आमचे आकार व रूप वेगवेगळे आहे.


तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत तुम्ही अनेक जीवनावश्यक गोष्टींचा वापर करीत असाल. त्याच आवश्यक गोष्टींपैकी एक आहे मी म्हणजेच आरसा. कारण आज-काल घरातून बाहेर पडणारा प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरूष प्रत्येक जण एकदा तरी आरशात आपला चेहरा हा पाहतो. मी माझ्या मध्ये लोकांना त्यांचे स्वरूप दाखवतो. माझ्यामध्ये आपली प्रतिमा पाहून लोक आनंदित होतात. मी नेहमी लोकांना त्यांच्या वास्तविक स्वरूपाची ओळख करून देतो. मी नेहमी सत्यच दाखवतो. स्त्रिया तर त्यांच्या सौंदर्याकडे पाहत तासन्तास माझ्यासमोर उभ्या असतात. 


सुंदर लोक तर माझ्यासमोर तासन्तास बसतात परंतु जे लोक दिसण्यात कुरूप आहेत किंवा ज्यांचा चेहरा काय कारणास्तव खराब आहे असे लोक माझ्यापासून दूर पडतात. स्वतःचा चेहरा आरशात पाहिल्यावर त्यांना इतरांपेक्षा कमीपणाची भावना निर्माण होते. परंतु अश्या सर्व लोकांना माझे सांगणे आहे की सत्यापासून दूर पळून काहीही फायदा नाही. आपल्याकडे सौंदर्य नसल्याच्या सामना करा,कारण सुंदर शरीरापेक्षा सुंदर मन आणि विचार खूप मोठे असतात. माझे कार्य तर फक्त बाह्य सौंदर्य दाखवणे आहे. आतील सौंदर्य तर तुमचा व्यवहार आणि वागणुकीतून लक्षात येते. 


असो, याशिवाय तुला माहित आहे का, की मी तुमचा साठी किती उपयोगी पडतो? नाही माहित असेल तर ऐक, बऱ्याच ठिकाणी सजावटीसाठी मला वापरले जाते. फोटो स्टुडिओ तसेच पार्लरमध्ये मी अति आवश्यक भूमिका बजावतो. आज जगभरात माझ्यामुळेच अनेक शास्त्रज्ञांनी शोध लावले आहेत. भौतिकशास्त्रातील प्रकाशाचे नियम माझ्यामुळेच समजता आले आहेत. याशिवाय तुम्ही जी मोटरसायकल किंवा मोटार गाडी चालवता त्यालाही मी लटकलेला असतो. माझ्यामुळेच तुम्हाला मागून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज लागतो. जर मी नसतो तर गाडीवर जात असताना पुन्हा पुन्हा मागे मान वळवून  पाहावे लागले असते. ज्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असते.


परंतु चिंता करू नको मी कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही. कारण मनुष्याची सेवा करणे माझे कर्तव्य आहे. मला इतरांना मदत करण्यात खूप आवडते. परंतु एका गोष्टीची मला खूप खंत वाटते की,आज-काल मला पुसण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा वापर केला जातो ज्यामुळे मला इजा होते. म्हणून मला पुसण्यासाठी रासायनिक द्रव्य न वापरता स्वच्छ कपड्याने पुसत जा. बरं!! येतो मग मी आता. पुन्हा भेटूया... धन्यवाद.