Advertisement

शेतकरी मराठी निबंध | Farmer essay in marathi

शेतकरी निबंध मराठी। Shetkari Nibandh in Marathi (150 Words)

भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. भारतात जवळपास 22 प्रमुख भाषा व 720 बोल्या बोलल्या जातात. भारतात अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात. पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणूनच भारताला 'कृषी प्रधान देश' म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी भारताचा कणा आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत त्याचे 17% योगदान आहे.  शेतकऱ्यांमुळेच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. या शिवाय दर वर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते.


भारतीय शेतकऱ्याचे अर्थव्यवस्थेत येवढे मोठे योगदान असताना देखील त्याची अवस्था आज दयनीय आहे. शेतकरी आज आत्महत्या करीत आहेत. काही शेतकरी शेती सोडून इतर व्यवसाय पाहत आहेत. खेड्यातून रोजगाराच्या शोधात शहरी भागात येत आहेत. शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला दोन वेळेचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. 


शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यायला हवे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण द्यायला हवे. शासनाने त्यांच्या धान्याला योग्य भाव मिळवून द्यायला हवा. नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा आपण खाद्य निर्यात देशापासून एक खाद्य आयातक देश बनून जाऊ. 

शेतकरी निबंध मराठी। Shetkari Essay in Marathi (150 Words)

भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारताच्या या खाद्य संपन्नते मागे शेतकऱ्याचे योगदान मोलाचे आहे. भारत ही शेतकऱ्याची भूमी आहे. आपल्या देशाची 72% लोकसंख्या गावामध्ये राहते व शेती करते. भारतीय शेतकऱ्याचा सर्वकडे सन्मान होतो. कारण शेतकरीच संपूर्ण देशासाठी खाद्य उगवतो. शेतकऱ्याचे जीवन अतिशय व्यस्त असते. शेत नांगरणे, बी लावणे, रात्रंदिवस शेताची राखण करणे इत्यादी कार्यामध्ये शेतकरी कायम गुंतलेला असतो.


शेतकरी सकाळी लवकर उठतो आपले बैल आणि इतर सर्व सामान घेऊन शेताकडे निघतो. तासनतास तो शेतात काम करतो. शेतकऱ्यांच्या घराचे इतर लोक सुद्धा शेतात त्याची मदत करतात. शेतकऱ्याचे जेवण अतिशय साधे असते. बरेच शेतकरी चटणी भाकर खाऊन दिवस काढत असतात. दुपारी शेतकऱ्यांच्या घरून त्याची पत्नी किंवा दुसरे कोणीतरी जेवण घेऊन येते. शेतकरी जेवण करून काही मिनिटांच्या विश्रांती नंतर पुन्हा आपल्या कामाला लागतो. तो कठीण परिश्रम करतो. पण एवढ्या परिश्रमानंतर देखील त्याला जास्त लाभ होत नाही. 


शेतकऱ्याचे जीवन खूपच साधे असते. त्याचा पेहराव ग्रामीण असतो. बरेच शेतकरी कच्या घरात राहतात. शेतकऱ्याची संपत्ती बैल आणि काही एकर जमीन असते. शेतकरी हा देशाची आत्मा असतो. लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' चा नारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की शेतकरी हा भारताचा आत्मा आहे. म्हणून आज शेतकऱ्याला सरकार द्वारे अधिकाधिक मदत मिळायला हवी. त्यांना शेताचे सर्व आधुनिक यंत्र व कीटनाशके उपलब्ध करून द्यायला हवेत.


स्वातंत्र्यप्राप्तीच्या अनेक वर्षांनंतर ही शेतकऱ्यांची स्थिती जशीच्या तशी आहे. बऱ्याच शेतकरी कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण आहे. ज्यामुळे दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या करतात. पण 2015 च्या एका रिपोर्टनुसार आता देशातील शेतकरी आत्महत्या दरात घट झाली आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नष्ट झालेल्या पिकाबद्दल योग्य भरपाई देण्यासाठी कायदे बनवले आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा केली जाते. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला थोडी फार का होईना पण मदत होते. 

शेतकरी मराठी निबंध | Farmer Essay in Marathi (300 Words)

भारताला कृषी प्रधान देश म्हटले जाते. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हाच आहे. शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हटले जाते. शेतकरी हा संपूर्ण दिवस शेतात काम करतो. ऊन, वारा, पाऊस इत्यादींची पर्वा न करता आपले कार्य करीत असतो. शेतकरी कठीण परिश्रमाचे प्रतीक आहे. त्याच्यात फार संयम असतो. वर्षभर शेतात काम करून तो आपल्या कष्टाच्या फळाची वाट पाहत बसतो. 


शेतकरी आपले जीवन सन्मानाने जगतो. आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात घालवतो. शेतकऱ्याचे जीवन संतुलित असते. तो दररोज सकाळी लवकर उठतो. दिवसभरात त्याला अनेक कामे करायची असतात. सकाळी लवकर उठून तयारी वैगरे करून तो शेताकडे निघतो. तो आपला संपूर्ण दिवस शेतातील पिकांची काळजी मध्ये घालवतो. शेत नांगरणे, पीक पेरणे, पिकाला पाणी देणे, ऊन वाऱ्यापासून आपल्या पिकाचे रक्षण करणे इत्यादी अनेक कामे शेतकऱ्याला करावी लागतात. 


शेतकरी त्याचे पीक अनेक नैसर्गिक आपत्या पासून संरक्षित करतो. पशु, पक्षी, किडे, मुंग्या इत्यादींपासून तो आपल्या पिकाचे रक्षण करतो. शेतात सुंदर बहरलेल्या पिकामागे शेतकऱ्याची शेताविषयीची भक्ती, प्रेम आणि कठीण परिश्रम असते. एक शेतकरी संपूर्ण जगातील मानवाला अन्न पुरविण्यासाठी आपल्या जीवन व्यतीत करतो. दिवसभर शेतात काम केल्यावर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर शेतकरी आपल्या घरी पोहोचतो. ज्यावेळी तो घरी पोचतो तेव्हा तो अत्यंत थकलेला असतो पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. हा आनंदच त्याच्या कष्टाचे फळ असते. 


कोणत्याही देशाच्या यशासाठी शेतकऱ्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. शेतकरी आपल्या प्रयत्नांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करू शकतो. आणि म्हणूनच शेती व शेतकऱ्याला अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील शासनाची ही जबाबदारी आहे की त्यांनी शेतकऱ्याची योग्य सोय करायला हवी, जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले कार्य करू शकतील. 


शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी शासनाने प्रोत्साहित करायला हवे. आधुनिक पद्धतीने केलेली शेती त्यांना कमी कष्टात जास्तीचे उत्पन्न मिळवून देऊ शकते. शेतकऱ्याचे जीवन आपल्याला अनेक शिकवण देऊन जाते. त्यांचे कठीण परिश्रम आणि संयम आपण सर्वांसाठी एक एक उदाहरण आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांची जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्यांना शक्य होईल तशी मदत करायला हवी. जर काही कारणास्तव शेतकऱ्याचे पीक नष्ट झाले असेल तर त्याला आर्थिक सहाह्य करायला हवे.

--समाप्त--