Advertisement

माझे पहिले भाषण मराठी निबंध | Maze Pahile Bhashan marathi nibandh

माझे पहिले भाषण निबंध | Maze Pahile Bhashan Marathi Nibandh

उत्तम पद्धतीने भाषण करणे ही देखील एक महत्त्वाची कला आहे. चांगले भाषण कौशल्य असणाऱ्या नेत्याला लोकांची मते आपल्याकडे वळवता येतात. आमच्या शाळेत दरवर्षी अनेक विषयांवर भाषणे आयोजित केली जायची. माझ्या शालेय जीवनात मी बऱ्याचदा भाषणे दिली आहेत. परंतु कायम माझ्या स्मरणात असलेले भाषण आहे, माझे पहिले भाषण. 


माझे पहिले भाषण 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त चे भाषण होते. त्या वेळी मी इयत्ता पाचवीत होतो. आमच्या मुख्याध्यापक सरांनी प्रत्येक वर्गातील कमीतकमी 4 विद्यार्थ्यांना भाषणासाठी तयार करायला सांगितले होते. दुपारी शाळा सुरू झाल्यावर आम्ही सर्वजण वर्गात बसलो होती. इतक्यात वर्गशिक्षक सर आले. सर्वांनी सरांना अभिवादन केले. या नंतर सर भाषणाची सूचना देऊ लागले आणि सांगितले की मी ज्या विद्यार्थ्यांची नावे घेईल त्यांना 1 ऑगस्ट रोजी भाषण द्यावेच लागेल. 


सरांची ही सूचना ऐकुन आम्ही बॅकबेंचर विद्यार्थी तर बुचकळ्यात पडलो. आम्ही एकामेकांमागे चेहरे लपवू लागलो. आणि सरांनी नाव घेणे सुरू केले. पाचवीच्या वर्गातून भाषण देणाऱ्या 4 विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. या नावांमध्ये मी आणि माझ्या आजूबाजूची 3 मुले होती. एकाच बाकावर बसून अभ्यास कमी आणि गप्पा गोष्टी जास्त करणारे आम्ही विद्यार्थी होतो. आम्हाला अद्दल घडावी म्हणून सरांनी ही शक्कल लढवली. या शिवाय सरांनी वर्गातील भाषणासाठी इच्छुक असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांची नावे देखील यादीत लिहून घेतली.  


त्या दिवशी मी घरी आलो. माझ्या मोठ्या ताईला सांगितले, "दीदी परवा भाषण आहे, सरांनी माझे नाव बळजबरी लिहून घेतले आहे...! काय करू आता?" माझी दीदी इयत्ता 10 वी मध्ये शिकत होती आणि अभ्यासात फार हुशार होती. तिने मला सांगितले की, "भाषण देणे काही कठीण नसते, मी तुला भाषण लिहून देते त्यापैकी जेवढे तुझ्या लक्षात राहील तेवढे ठेव. व जर आठवण राहिले नाही तर वाचून देखील तू भाषण देऊ शकतो." दीदींच्या धीराने मी थोडा सुखावलो. 


यानंतर सर्वकाही सोडून मी भाषण पाठ करणे सुरू केले. नंतर भाषणाचा दिवस उगवला. एक एक जण भाषण देऊ लागले. आणि हळू हळू माझा नंबर जवळ येत होता. माझे नाव पुकारण्यात आले. मी भीतीने थर थर करायला लागलो. सर्वजण उत्सुकतेने माझ्याकडे पाहत होते. माझे पाय नकळत व्यासपीठाकडे सरकू लागले. माईक समोर जाऊन उभा राहिले खाली बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीला पाहून पायांचा थरकाप थांबत नव्हता. पोपटासारखे पाठ केलेले भाषण आठवत नव्हते. कुठून सुरू करावे काहीच कळत नव्हते. 


हातात धरलेला माईक, उजव्या बाजूला शिक्षक, समोर बसलेले विद्यार्थी आणि चहूबाजूंना असलेली भयाण शांतता माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. जोरजोरात सुरू असलेले हृदयाचे स्पंदन कानावर ऐकायला येत होती. नंतर मी वर पाहायला लागलो. एक दीर्घ श्वास घेऊन ठरवले की कोणाकडेही न पाहता जेवढे आणि जसे आठवण आहे तसे भाषण बोलून टाकावे. इतक्यात विद्यार्थ्यांमधून काहीतरी कुजबुजण्याचा आवाज आला. शिक्षक रागावतील म्हणून मी अडखळत भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला थोडा घाबरलो होतो परंतु जसेही भाषण सुरू केले, माझ्यात असलेली भीती कमी होऊ लागली. कापणारे माझे पाय हळू हळू स्थिर झाले. हृदयाची धडधड कमी होऊ लागली. आवाज आधी पेक्षा स्पष्ट निघू लागला. आणि अशा पद्धतीने मी माझे भाषण संपवले. 


भाषण संपताच सर्वांनी टाळ्या वाजवून मला प्रोत्साहित केले. मला खूप आनंद वाटत होता. भाषण संपल्यावर माझ्या जागेवर येऊन मी बसलो. मनातल्या मनात विचार करू लागलो की विनाकारण मी माझ्या मनात भीती निर्माण केली होती. या भाषणाने मला अधिक धैर्यवान बनवले. यानंतर मी नैतृत्वाचे गुण जोपासण्यासाठी प्रयत्न करणे सुरू केले व शाळेत होणाऱ्या प्रत्येक भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागलो. माझे स्वप्न आहे की पुढे जाऊन मी माझ्या आयुष्य एक प्रभावी वक्ता बनून माझ्या भाषणाद्वारे इतरांना प्रेरणा देईल.

**समाप्त**