Advertisement

स्वामी विवेकानंद निबंध मराठी | Swami Vivekananda Essay in Marathi

स्वामी विवेकानंद निबंध- swami vivekananda nibandh in marathi

(400 शब्द)

भारत देश महान साधू संतांची भूमी आहे. आपल्या देशात अनेक साधू संत होऊन गेलेत ज्यांनी आपले कर्तुत्व आणि आध्यात्मिक शक्तीच्या बळावर संपूर्ण जगाचे मार्गदर्शन केले. अश्याच या महान संतांपैकी एक संत स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंदांना जगातील महापुरुषांमधून एक मानले जाते. विवेकानंदांनी भारताचा गौरव संपूर्ण जगाला दाखवून दिला.   स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला कोलकत्यात झाला. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकत्यातील प्रसिद्ध वकील होते व ते पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित होते. विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी धार्मिक विचाराची महिला होती. त्यांच्या आईचा अधिकांश वेळ भगवान शंकराची पूजा करण्यात जायचा. 


नरेंद्रनाथ यांची बुद्धी लहानपणापासूनच तेज होती. परमेश्वराला मिळविण्याची लालसा त्यांच्यात लहानपणापासूनच निर्माण झाली. सन 1871 मध्ये आठ वर्षाच्या वयात नरेंद्रनाथ यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर मेट्रोपोलिटिअन संस्था मध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला. प्राथमिक शिक्षण मिळवल्यानंतर जनरल असेंबली इन्स्टिट्यूशन मधून त्यांनी FA आणि BA परीक्षा पास केल्या. अभ्यासात तत्वज्ञान हा विषय त्यांच्या आवडता विषय होता. यामुळे परमेश्वर आहे का? परमेश्वर असेल तर मग तो कसा असेल? असे देवाविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असत. एकदा कोणीतरी त्यांना श्रीरामकृष्णाची भेट घेण्याचे सुचवले. 


श्रीरामकृष्णाच्या प्रथम भेटीतच विवेकानंदांनी त्यांना आपले गुरु म्हणून स्वीकार केले. श्रीरामकृष्णाची सरलता आणि ईश्वरी अनुराग पाहून नरेंद्र प्रभावित झाले. नरेंद्र आजवर जितक्या माणसांना भेटले होते त्यात फक्त श्रीरामकृष्णांनी स्वतःला जिंकले होते. व यानंतर नरेन्द्रनाथ आपल्या गुरुसोबतच राहू लागले. काही वर्षांनंतर 1886 साली श्रीरामकृष्णांचे घशाच्या कर्करोगाने निधन झाले. श्रीराम कृष्णांच्या मृत्यूनंतर नरेंद्रनाथ यांनी वराहनगर मध्ये रामकृष्ण संघाची स्थापना केली. 


सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो मध्ये विश्व धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. मद्रास मध्ये असताना अमेरिकेत होत असलेल्या सर्वधर्मपरिषदेत स्वामीजींनी जावे, व तेथे हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करावे अशी विनंती मद्रासमधील तरुणांनी केली. या कार्यासाठी तरुणांनी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. स्वामीजींनी प्रथम अमेरिकेतील शिकागो आणि नंतर इंग्लंडच्या जनतेवर प्रचंड प्रभाव निर्माण केला. 'भारताच्या प्राचीन नीतिमूल्यांचा उद्गाता' म्हणून वृत्तपत्रानी त्यांना उच्च मानवंदना दिली. एका रात्रीतच ते भारताचे राष्ट्रीय नेता म्हणून प्रसिद्ध झाले. यानंतर हळूहळू भारतीय सुशिक्षितांचे आपल्या भारताबाबत आणि आपल्या संस्कृतीबद्दल मत परिवर्तन होण्यास सुरुवात झाली.  आपण भारतीय लोक धर्म क्षेत्रात, तत्त्वज्ञानात,कलेत आणि साहित्यात मागासलेले तर नव्हतेच उलट विदेशी लोकांपेक्षा जास्त प्रगत आहोत असा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण झाला. भारतीय अस्मितेच्या जागृतीचा तो एक क्षण होता.


4 जुलै 1902 ला 39 वर्षाच्या वयात स्वामी विवेकानंदानी आपला शेवटचा श्वास घेतला, त्या काळात ते बेलूर मठात होते. स्वामाजिनी आपल्या महासमाधीची भविष्यवाणी आपल्या शिष्यांना आधीच सांगून दिली होती. स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी विचारांनी ओतप्रोत महान संत आणि विचारक होते. त्यांनी आपल्या कार्यातून भारतीयच नव्हे तर युरोप व जगातील अनेक देशासमोर आदर्श मांडला. 

--समाप्त--